गडचिरोली - सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दोन घरांवर धाड टाकून 27 हजार रुपयांचा देशी, विदेशी आणि गावठी दारूचा साठा जप्त केला. यावेळी दारूच्या तब्बल 46 बाटल्या महिलांनी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी रेगुंठा पोलिसांनी बापू शिवराम कोंडागुर्ला आणि व्यंकन्ना किस्तय्या तोमराव या दोघांना अटक केली आहे.
नरसिंहपल्ली येथील महिला दारूविक्री बंद करण्यासाठी एकवटल्या आहेत. गावात दारूबंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. विक्रेत्यांना अनेकदा नोटीस देण्यात आली होती. तरीही दारूची विक्री सुरूच होती. गावातील काही घरी विक्रीसाठी दारू आणल्याची माहिती मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. मंगळवारी सकाळी पाचही विक्रेत्यांच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. यापैकी तीन घरांना कुलूप होते. दोन घरांच्या झडतीमध्ये विदेशी दारूच्या 46 बाटल्या महिलांनी जप्त केल्या. सोबतच तीन हजाराची गुळाची दारूही ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण 27 हजार 740 रूपयांचा दारूसाठा महिलांनी पकडला.
हेही वाचा -
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी गडचिरोली, चामोर्शीत आंदोलन
रेगुंठा पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किमी अंतरावर नरसिंहपल्ली हे गाव आहे. असे असतानाही गावात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी आणि विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने धाडसत्र राबवून विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला करीत आहे.