मुंबई - गडचिरोलीत पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. (Dilip Walse Patil Congratulate Police Force)
- पोलिसांची कारवाई काय?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक(Naxals killed in encounter in Gadchiroli forest) झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल(Gadchiroli SP Ankit Goel) यांनी दिली आहे. या चकमकीत चार पोलीस(Four Police Jawans Injured) जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
- कारवाईनंतर गृहमंत्रालयाचे ट्विट -
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले, असे ट्विट गृहमंत्रालयाने केले.
हेही वाचा - Gadchiroli Naxal Encounters : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकींचा आढावा
- पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन, 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान
दक्षिण गडचिरोलीमध्ये कोरपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी होत्या. घटनेनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. आतापर्यंत 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, घटनास्थळी आताही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
- कोण आहेत सी-60 कमांडो?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.