गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता लोकबिरादरी प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचनाची कामे करत आहेत. लोकबिरादरीने अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली येथील तलाव पूर्ण केला असून आतापर्यंत 25 तलावांचे कामे पूर्ण झाली आहेत. लोकबिरादरी प्रकल्प संचालक अनिकेत आमटे यांनी 2016 पासून हे काम हाती घेतले आहे.
भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र या तालुक्यात विविध समस्या आहेत. इंद्रवती, पामुलगौतम, पर्लकोटा या बारामाही वाहणाऱ्या नद्या याठिकाणी आहेत. मात्र सिंचनाची सुविधा नाही. आजही पावसावर अवलंबून येथील शेती आहे. शेतकऱ्यांचा समस्या लक्षात घेता लोकबिरदरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी 2016 ला भामरागड तालुक्यातील जिंजीगावातून तलाव निर्मितीचे कार्य सुरु केले. आतापर्यंत विविध गावात तब्बल 25 तलावांची निर्मिती करण्यास यशस्वी झाले आहे. या संदर्भात अनिकेत आमटे यांचाशी संपर्क साधला असता, ‘आपल्या तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. सिंचन सुविधेअभावी शेती विकास शक्य नाही. त्यामुळे तलाव निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांना तलावाच्या पाण्यामुळे पीक घेणे सोयीचे होईल आणि कोरड्या दुष्काळापासून शेती वाचविता येईल. तसेच मासेमारी व्यवसायही करता येईल परिणामी जमीनीतील जलस्रोत वाढेल’. शेती विकास करण्याच्या दृष्टीने काम हाती घेत लोकसहभागातून जिंजीगावातून सुरुवात करत आज तब्बल 25 गावांना सिंचनाची सोय झाली आहे.