गडचिरोली - कोरोना विषाणूचा प्रसार देशात आणि महाराष्ट्रात झपाट्याने होत आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत शासनाने आदेश दिले असल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत लोक बिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला आहे.
हेही वाचा - 'कोरोना'बाबत जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेली 46 वर्षे हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी विकासाचे काम करत आहे.
सर्वोपचार मोफत रुग्णालय, 650 विद्यार्थ्यांसाठी 1 ली ते 12 वी पर्यंतची आश्रमशाळा, वन्यजीव अनाथालय व पर्यावरण संवर्धन, गाव विकास, तलाव निर्मिती व खोलीकरण, नेलगुंड्यासारख्या दुर्गम भागात शाळा अशा विविध स्तरावर अविरत लोक बिरादरी काम करत आहे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशानुसार आश्रमशाळेला सुट्टी देण्यात आली आहे. प्रकल्पात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि रूग्णालयातील आदिवासी रुग्णांना येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना विषाणूची बाधा होऊन प्रसार होऊ नये, यासाठी प्रकल्प बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प संचालक अनिकेत आमटे यांनी दिली आहे.
हेही वाचा - अनर्थ टळला..! गडचिरोली पोलिसांनी उधळला नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट