गडचिरोली - जिल्ह्यातील आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. सोमवारी भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथे साधना विद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या विद्यालयात यावर्षी बालवाडी आणि इयत्ता पहिलाचा वर्ग सुरू करण्यात आला आहे.
शाळेचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या अर्धांगिनी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, प्रमुख अतिथी म्हणून जितू नायक, खांडेकर, डॉ. निर्भय करंदीकर, डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, समीक्षा आमटे, भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, प.स.सदस्य इंदरशाई मडावी, सीताराम मडावी उपस्थित होते.
लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील शाळेत दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या तालुक्यात 2015 साली नेलंगुन्डा येथे साधना विद्यालय सुरू करून दुर्गम भागातील आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंग्रजी माध्यातून शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग आमटे परिवाराने केला. पहिला प्रयोग सफल झाल्याने त्यानंतर या तालुक्यातील लोकांच्या आग्रहास्तव जिंजगाव येथे साधना विद्यालयाची दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत 2019-20 या शैक्षणिक वर्षात बालवाडी आणि पहिला वर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता इंग्रजी शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.