गडचिरोली - वीज देयके घरोघरी जाऊन वाटप न करता चक्क पाण्याच्या टाकीला अडकवून कंत्राटदार मोकळा झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली येथे बघायला मिळाला आहे. कंत्राटदाराच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुलचेरा येथील वीज वितरण विभागाच्यावतीने वीज ग्राहकांची देयके वितरण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीकडून ग्रामीण भागातील देयके वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. आंबटपल्ली या गावात तर वीज देयके ग्राहकांना न देता चक्क पाण्याच्या टाकीला अडकविलेले दिसून येत आहे. त्यामुळे या गावातील ग्राहकांना वीज देयके मिळू शकले नाही. उलट वीज देयके भरण्यासाठी उशिरा झाल्यास वीज कपात करण्याचा कडक नियम वीज वितरण विभागाकडून अवलंबवले जाते. अशा परिस्थितीत वेळेवर वीज देयके ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम वीज वितरण विभागाचे असून याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक भागाची देयके असून गोमणी भागातील विज देयके तांत्रिक अडचणीमुळे उशिरा देण्यात आले. मात्र, देयके ८ फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आले होते. मीटर रिडींगपासून तर वीज देयके वाटप करण्यापर्यंत प्रत्येकी बिलामागे ४ रुपये दिले जातात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या घरापर्यंत देयके पोहोचविणे, ही संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. आंबटपल्ली येथील प्रकार लक्षात घेता अंतिम तारखेच्या अगोदर वीज देयके ग्राहकांना कसे दिले जाईल, याबाबत दक्षता घेण्यात येईल, असे मुलचेराचे उपअभियंता सचिन निमजे यांनी सांगितले.