गडचिरोली - देशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात समावेश असलेल्या गडचिरोलीच्या विकासाचा आढावा केंद्रीय संयुक्त सचिव (स्मार्ट सिटी मोहिम) कुणाल कुमार यांनी घेतला. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या योजनांबाबत अडचणी असल्यास त्यावरील उपाययोजनांबाबत प्रस्ताव तयार करून वार्षिक आराखडयात समाविष्ट करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
देशातील महत्त्वाकांक्षी जिल्हयाचा आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरावरुन संयुक्त सचिव, कुणाल कुमार गडचिरोली येथे आले होते. त्यांनी जिल्हयातील विविध कामांबाबत माहिती जाणून घेतली. यामध्ये जिल्हयातील रस्ते, वीज, आरोग्य, व शिक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.
विकासकामांची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतात. त्या तातडीने सोडवण्यासाठी नवीन जोडयोजना राबवावी लागते. त्याकरिता प्रत्येक विभागाकडून प्रतिक्रिया येणे तसेच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, व्हेंटीलेटरर्स, रुग्णवाहिका उपलब्ध
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत कुणाल कुमार यांना माहिती दिली. यावेळी कुणाल कुमार यांनी कोरोना काळात जिल्हयात आरोग्य क्षेत्रात वाढलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. ते म्हणाले कोरोना संसर्गमुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, व्हेंटीलेटरर्स, रुग्णवाहिका, प्रयोग शाळा व खाटा उपलब्ध झाले. याचा फायदा भविष्यात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी होणार आहे.
अखंडितपणे वीज पुरवठा करा-
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज अखंडीत मिळणेही महत्त्वाचे आहे. वीजेमुळे विकासाला गती देता येते. जिल्ह्यातील स्थानिक वस्तु, हस्तकला तसेच इतर वनोपज यावर उद्योग निर्माण करून त्याची विक्री जिल्ह्याबाहेर होणे आवश्यक आहे. आर्थिक गती देण्यासाठी जिल्हयातील व्यवसाय मोठे करून त्याला जागतिक अर्थचक्राशी जोडणे आवश्यक असल्याचे कुणाल कूमार यांनी म्हटले. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या बचत गटांचा तसेच विविध लोक समूहांचा वापर करुन उद्योगाला चालना देता येईल. मत्स्य व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसायाला चालना देणेही गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाकांक्षी गडचिरोली जिल्ह्याची सद्य:स्थिती -
गडचिरोली जिल्ह्याचा देशातील 115 महत्त्वाकांक्षी जिल्हयात समावेश होतो. या सर्व महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात विकासकामाच्या दृष्टीने जिल्हयाचा डेल्टा क्रम 28 वा आहे. आरोग्य आणि पोषण यामध्ये 72.3 गुण, शिक्षण क्षेत्रात 58.5 गुण , शेती आणि जलस्त्रोत - 13.6 गुण, अर्थ आणि कौशल्य विकास - 24.9 तर सर्वसाधारण सोयी सुविधांमध्ये 64.7 गुण जिल्ह्याला मिळाले आहेत.