गडचिरोली - गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर मोठा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. दोन वाहनांमध्ये २५ जवान होते.
वीरमरण आलेल्या जवानांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात उद्या (गुरूवार) दुपारी 3 वाजता मानवंदना देण्यात येणार आहे. वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अमरीश आत्राम, महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आदी उपस्थित राहणार आहेत
मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचा समावेश आहे.
महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना अशी नक्षली हल्ल्याची घटना घडल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शिघ्र प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. त्यावेळी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला. कुरखेडा येथील विठ्ठल गहाने यांच्या मालकीचे हे वाहन होते. तोमेश्वर भागवत सिंगनाथ (26) हे वाहन चालक होते. त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.
मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये शांततेत सहभाग नोंदवला होता. लोकांमध्ये मतदान न करण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक मतदार केंद्रांपर्यंत पोहोचले. याचा राग नक्षलवाद्यांच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडवला असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल असेही मुनगंटीवार म्हणाले.
शहीद जवानांचे मृतदेह अद्यापही घटनास्थळीच आहेत. आणखी घातपात होण्याची शक्यता असल्याने कोरची मार्गावरील वाहतूक रोखली आहे. घटनास्थळी कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयातून मदत पथक अद्याप घटनास्थळी पोहोचले नाही. याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोरदार वादळही सुरु झाले आहे.
वीरमरण आलेल्या जवानांची नावे
१) शाहुदास बाजीराव मडवी (रा. चिखली ता. कुरखेडा)
२) प्रमोद महादेवराव भोयर (देसाईंगज, गडचिरोली)
३) राजू नारायण गायकवाड (मेहकर जि. बुलढाणा)
४) किशोर यशवंत बोबाटे (आरमोरी जि. गडचिरोली)
५) संतोष देविदास चव्हाण (ब्राम्हणवाडा ता. औंध जि. हिंगोली)
६) सर्जेराव एकनाथ खर्डे (आळंद ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा)
७) दयानंद ताम्रध्वज शहारे (रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा)
८) भूपेश पांडूरंग वालोदे ( लाखनी जि. भंडारा)
९) आरीफ तूशीब शेख (रा. पाटोदा जि. बिड)
१०) योगाजी सिताराम हलामी (रा. मोहगाव ता. कुरखेडा)
११) लक्ष्मण केशव खोडपे (रा. बेंगलखेडा ता. कुरखेडा)
१२) अमृत प्रभुदास भदाडे (रा. चिंचघाट ता. कुही जि. नागपूर)
१३) अग्रमन बक्षी रहाटे (रा. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ)
१४) नितिन तिलकचंद घोरमारे (रा. कुंभाली ता. साकोली जि. भंडारा)
१५) पूरणशहा प्रतापशहा दुगा (भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली)