गडचिरोली - महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी गडचिरोलीत 'बेबी मडावी- महिला विकास साखळी'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाभरातील तब्बल ११ हजार महिला आणि विद्यार्थिनींनी साडेसहा किलोमीटरवर महिला साखळी तयार करून महिला संरक्षणाचा संदेश दिला.
२८ सप्टेंबर २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील इरणपार येथील २५ वर्षीय बेबी मडावी या आदिवासी तरुणीला तिच्या राहत्या घरातून नक्षलवाद्यांनी उचलून नेले होते. बंदुकीचा धाक दाखवून तिला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी धमकावण्यात आले. मात्र, तिने नकार दिल्याने ६ ऑक्टोबर २०१८ ला तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. नक्षलवाद्यांकडून नेहमीच आदिवासींवर अशाप्रकारे अत्याचार होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नक्षलवाद्यांनी केलेल्या कृत्यांचा निषेध, बेबी मडावी हिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच आदिवासी महिलांच्या स्वप्नपूर्तीला बळ देण्यासाठी महिला विकास साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
या महिला साखळीमध्ये जिल्हाभरातील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. तब्बल ११ हजार महिला आणि विद्यार्थिनींनी गडचिरोली शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत अशी साडेसहा किलोमीटरची महिला साखळी तयार केली होती. तत्पूर्वी इंदिरा गांधी चौकात मृतक बेबी मडावीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला नागपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिप्सीवरून महिला साखळीचे निरीक्षण केले. या महिला साखळीमुळे धानोरा, आरमोरी, चामोर्शी, चंद्रपूर या चारही मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.