गडचिरोली - छत्तीसगड राज्याप्रमाणे जिल्ह्यातही जिल्हा निर्माण समिती तयार करावी तसेच १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्ह्यात नक्षली चळवळीमुळे रस्ते, पुल तसेच अन्य कामे करण्यास अडथळे येत आहेत. नक्षल्यांकडून वारंवार होणाऱ्या जाळपोळीमुळे कंत्राटदारही कामे बंद करतात. यामुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण पुरवून कामे पूर्णत्वास नेण्यास पोलीस विभाग पूर्णपणे सहकार्य करत आहे. मात्र, जिल्हा निर्माण समिती तयार केली तर ही कामे अधिक गतीने होतील, त्यामुळे पोलिसांनी याबाबतची मागणी सरकारकडे केली आहे.
जिल्हा निर्माण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात तर, पोलीस अधीक्षक आणि मुख्य प्रादेशिक वनसरंक्षक हे या समितीचे सदस्य असतात. जिल्ह्यात रस्ते, पुल निर्मिती तसेच अन्य कामे, सामूहिक विवाह सोहळे, जनजागरण मेळाव्यांमधून विविध साहित्यांचे वितरण करण्यासाठी शासनाने १०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे, अशी माहिती बलकवडे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात पोलीस शिपायांच्या २२५ पेक्षा अधिक जागा भरणार आहेत. पुढील काही महिन्यात याबाबत कार्यवाही सुरू होईल. या सर्व जागांवर जिल्ह्यातीलच उमेदवारांना स्थान दिले जाणार आहे. यामुळे पोलीस दल बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.