गडचिरोली - राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मंगळवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल २७ वाहने जाळल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. या घटनेत १० ते १५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु आहे. हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने उभी होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली.
या आगीत एक कंटेनर लॅब, कंटेनर कार्यालय, 10 चाकी 11 हायवा ट्रक, 12 चाकी 1 हायवा ट्रक, 2 बोझर, 1 डिझेल टँकर, 1 जनरेटर, 1 डबल ड्रम, 1 कोमास्टू, 2 छोटा हत्ती वाहन, 1 महिंद्रा कॅम्पर, 2 जेसीबी, 1 टाटा 120, 1 वॉटर टँकर, 1 ट्रेलर, 1 टाटा हिताची, 1 एमएम प्लांट असे एकूण 27 वाहने, 2 कंटेनर जाळले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.