गडचिरोली - जिल्ह्याबाहेरून आलेल्या मजूर, विद्यार्थी, प्रवासी व इतर नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी सोमवारी जिल्ह्यातील आरमोरी येथे संस्थात्मक विलगीकरण केलेल्या लोकांशी संवाद साधला.
पालकमंत्री विजय वडेट्टीवारांचा संस्थात्मक विलगीकरणातील लोकांशी संवाद जिल्ह्यात १८ हजार मजूर आणि इतर लोकांना संस्थात्मक आणि गृह विलगीकरणात ठेवले आहे. या ठिकाणी येथील नागरिकांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी त्यांनी केली. आरमोरी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह आणि प्रिती आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेमध्ये ठेवलेल्या जिल्ह्याबाहेरील मजूर, विद्यार्थी व प्रवाशांशी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुविधा यामध्ये जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवारांचा संस्थात्मक विलगीकरणातील लोकांशी संवाद सर्व नागरिकांनी पालकमंत्र्यांना 'आम्हाला घरी जाऊ द्या, आम्ही घरात स्वतंत्र राहतो', अशी मागणी केली. परंतु, 'तुम्ही ज्या ठिकाणाहून आलात, त्या ठिकाणी रेड झोन असल्याकारणाने आणि आपल्याच कुटुंबातील इतर लोकांची काळजी घ्यावयाची असल्याने तुम्हाला थोडे दिवस वेगळे राहणे गरजेचे आहे,' असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 'तुम्हाला 14 दिवसांनंतर घरपोच सोडण्यात येईल; काळजी करू नका, घाबरू नका, प्रशासनाला सहकार्य करा. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. तो ग्रीन झोनमध्येच राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे,' अशी त्यांनी नागरिकांना विनंती केली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवारांचा संस्थात्मक विलगीकरणातील लोकांशी संवाद यापूर्वी त्यांनी तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याशी कोरोना संसर्ग व संचारबंदी दरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना बाहेरून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाइन केले असल्यास आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच आरमोरी तालुक्यातील सरकारी रेशन ध्यान्य दुकानातून वाटप करण्यात येत असलेल्या धान्य वाटपाची माहिती घेतली. सर्व रेशन कार्ड धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या तरतुदीप्रमाणे वाटप करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले. भेटीवेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी, उपविभागीय अधिकारी देसाईगंज विशाल मेश्राम, तहसीलदार आरमोरी कल्याणकुमार दाहट, आरमोरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.