गडचिरोली - मुसळधार पावसामुळे परकोटा नदीला पूर आला होता. त्यामुळे, भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. भामरागड मधील शेकडो घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दोन दिवस नागरिकांचे मोठे हाल झाले. आज तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पूर ओसरला असून गावात पूर्णतः बारिक मातीचा थर साचल्याने चिखल पसरला आहे. भामरागड-आलापल्ली या प्रमुख मार्गावरही चिखल पसरल्याने जेसीबीद्वारे रस्ता साफ करण्यात आला.
6 ऑगस्टपासून सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला होता. भामरागडलगतच्या इंद्रावती, पामुलगौतम, पार्लकोटा या तीनही नद्यांना पूर आल्याने भामरागडला बेटाचे स्वरूप आले होते. शेकडो घरे पाण्याखाली गेल्याने अनेक नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे, नागरिकांनीच रस्त्यावरील पाण्यात बोट चालवून पिण्याच्या पाण्याची सोय केली. यावेळी 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
दोन दिवसानंतर आता पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आले असले, तरी रस्त्यावरचा चिखल पसरल्याने समस्या निर्माण झाली आहे.