गडचिरोली - भामरागड तालुका अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त तालुका म्हणून कसनसूर घटनेनंतर प्रसिद्ध झाला आहे. अशा ठिकाणी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण करताना नक्षलवाद्यांच्या कारवाया भामरागड पोलिसांपुढे मोठे आव्हानच होते.
पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले आणि निवडणुकीसाठी एक आठवड्यापूर्वीपासूनच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्यासह त्यांच्या गटाने दिवस-रात्र अथक परिश्रम घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदानसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दुर्गम भागातील पोलिंग पेट्या पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. यापूर्वी बिनागुंडा मतदान केंद्रावरुन पेट्या नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरवरच नक्षल्यांनी हल्ला चढवला होता. मात्र, नक्षल्यांचा गड समजला जाणाऱ्या बिनागुंडातही पोलिसांनी नक्षल्यांना प्रत्युत्तर दिले.