गडचिरोली - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात 1992 पेक्षाही मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने 600 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच 30 हजार 500 क्यूमेक्स पाणी सोडण्यात आलेे. गोसीखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. 24 ऑगस्ट 2013 रोजी 16 हजार 625 क्यूमेक्स, तर 9 सप्टेंबर 2019 रोजी 13 हजार 739 क्यूमेक्स पाणी गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आले होते. त्यानंतर आता सर्वाधिक पाणी सोडण्यात आले. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा तसेच अनेक उपनद्या व नाले फुगले असून, पाणी रस्त्यावर आले आहे.
हेही वाचा-गडचिरोली जिल्ह्यात पूर; रेस्क्यू करून २३ बांधकाम मजुरांना वाचवलं
रविवारी पहाटेपासून गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, आरमोरी-रामाळा, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, आरमोरी-ब्रम्हपुरी मार्ग बंद आहेत. देसाईगंज तालुक्यातील सावंगी, धरमपुरी येथील 360 व आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावातील 24 व्यक्तींना, वाघाडा, येथील सुमारे 200 व्यक्तींना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले.
कोटगल ब्यारेज बांधकाम स्थळी अडकलेल्या 23 कामगारांना रेस्क्यू करुन वाचविण्यात आले. पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.