गडचिरोली - 'जिल्हा प्रशासनाकडून गरजू व्यक्तींना आवश्यक प्रवासासाठी तातडीने परवानगी दिली जात आहे. कोणीही जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पाससाठी प्रत्यक्ष चौकशीसाठी येवू नये. गर्दी करून कोरोना संसर्गाला चालना देऊ नये. आम्ही गरजू नागरीकांना आवश्यकतेनुसार तातडीने ई-पास देत आहोत,' असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन कामाच्या वेळेत कंट्रोल रूमद्वारे गरजूंना मदत दिली जात आहे. ई-पास बाबत चौकशी करण्यासाठी कंट्रोल रूमच्या ०७१३२ २२२५०९ नंबर वर चौकशी करावी. ईपास बाबतची परवानगी गरजेच्या आणि आवश्यक कामांसाठीच दिली जात आहे. जो ई-पास प्रशासनाकडून नाकारण्यात आला आहे, त्यांनी प्रत्यक्ष येवून चौकशी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जर कुणी जिल्ह्याबाहेर जाणार असेल तर, वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. यामुळे पुढील प्रवासात कोणताही व्यत्यय येणार नाही किंवा आपणाला ई-पास देण्याबाबत परवानगी देणे सोयीस्कर होईल, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात जाण्यास व त्या ठिकाणाहून येण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ई-पाससाठी केलेला अर्ज नाकारण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.