गडचिरोली - महिला नक्षली नेता सृजनाक्का ही 2 मे ला झालेल्या चकमकी दरम्यान पोलिसांकडून मारली गेली. तिच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी एक आठड्यापूर्वी २० मे ला गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आज जिल्ह्यात उत्पात सुरू केला आहे. सकाळी धानोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव जवळ वाळू वाहतूक करणारी चार वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली.
जाळण्यात आलेली वाहने गडचिरोली येथील कंत्राटदार मल्लेलवार यांच्या मालकीची असून त्यात तीन हायवा ट्रक आणि एका साध्या ट्रकचा समावेश आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगडमधून रेती वाहतूक केली जात होती. या घटनेत कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
15 मे ला नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये चकमक झाली होती. भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगलात झालेल्या चकमकीत शीघ्र कृती दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि सी-60 पथकाचा एक जवान शहीद झाले होते.