गडचिरोली - भामरागडमध्ये पार्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानं अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नावेचा वापर करावा लागत आहे.
पाणी साचलेल्या ठिकाणी सामानाची गरज भागवण्यासाठी बोटीचा आधार घेतला जात आहे. लाहेरीवरून गडचिरोलीला येणारी बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून पडली आहे. पोलिसांनी चालक आणि वाहकाच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीनही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा दिला आहे. पाऊस अद्यापही सुरूच असल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरण्याची चिन्हे नाहीत. नागरिकांचे हाल होत असून अनेकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकट्या भामरागड तालुक्यात 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.