गडचिरोली - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा भामरागडसह तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
26 ते 29 जुलैला चार दिवस झालेल्या जोरदार पावसाने पर्लकोटा नदीला पूर येवून पहिल्यांदा भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर मार्ग सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने दुसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. आता पुन्हा 6 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने 15 दिवसात तिसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड गावात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पर्लकोटा नदीवरील पुलासह आलापल्ली ते भामरागड दरम्यान अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु असल्याने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापूर नाल्याला पूर आल्याने २५ गावांसह 3 तालुक्यातल्या 70 गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळ्यातील पुरामुळे वारंवार भामरागडचा संपर्क तुटत असल्याने या नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असता दिली होती.