गडचिरोली - जिल्ह्यात सुरु असलेलल्या अतिवृष्टीमुळे तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोनशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक गावातील वीज व भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे. तसेच पुरात तिघे वाहून गेल्याची घटना घडली असून त्यांचा शोध सुरू आहे.
रामदास मादगु उसेंडी (रा. निमगाव, ता. धानोरा) हे आरमोरी येथील नाल्यावरून शुक्रवारी वाहून गेले. तर सुधाकर पोटावी (वय 60 लसनपेठ, ता. चामोर्शी) ही व्याक्ती पोर नदीच्या पूरात शुक्रवारी वाहून गेली आहे. तसेच गणपती विसर्जन करताना नाल्यात तोल गेल्याने भगीरथ मोतीराम हिवरकर (वय 40 रा. मूलचेरा) हे देखील वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन आणि गावकाऱ्यांसोबत शोध मोहीम राबवीत असून अद्याप शोध लागला नाही.
भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला सहाव्यांदा पूर आला असून येथील 70 टक्के घरे पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवस सतत मुसळधार पाऊस झाल्यानंतर 6 ते 8 सप्टेंबरला पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारीच आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय सुट्टी जाहीर केली. आता पावसाने उसंत घेतली असली तरी अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 47.9 मिलिमीटर पाऊस झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 20 हून अधिक मार्ग बंद आहेत. दरम्यान या परिस्थितीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली आहे.