गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले.
![घटनास्थळी जप्त केलेले साहित्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4549610_gad4.jpg)
या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलीस विभागाने वर्तवला आहे. पोलीस दलाचे सी-60 जवान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
हेही वाचा - खुर्सापार परिसरात ३३ किलो चांदी जप्त; स्टॅटीस्टीक सर्व्हीलंस टीमची करवाई
प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केल्याने नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबवली. यामध्ये चार रायफल, पिटु, क्लेअर माईन व भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य आढळून आले. या परिसरात नक्षल विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.