गडचिरोली - राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी गडचिरोली येथे दिला. ते वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते.
दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज (शनवार) कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. यावेळी नैनपूर गावचे शेतकरी गजेंद्र ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.