गडचिरोली – राज्य सरकारने कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट संपलेले नाही. कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गिरीधर गोपाळ मुंगमोडे (५४ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गिरीधर मुंगमोडे यांच्या शेतात धानाची पेरणी सुरू होती. शेतातील काम आटोपल्यानंतर सोमवारी शेतामधील महिला व पुरुष घरी निघून गेले. त्यानंतर गिरीधर मुंगमोडे हे एकटेच शेतात विहिरीजवळ ठेवलेल्या सामानाची सावरासावर करीत राहिले. दरम्यान, रात्रीचे आठ वाजले तरी वडील घरी न परतल्याने मुलगा प्रमोद याने शेजारी लोकांसह शेत गाठले. त्यावेळी शेतातील पाणी नसलेल्या विहिरीत गिरीधर मुंगमोडे यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे ३६ फूट खोल असलेली विहीर कोरडी आहे. या विहिरीत बोअर असून त्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे मुंगमोडे यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन धानाची पेरणी केली होती.
मागील वर्षे त्यांचे पीक कर्ज माफ झाले होते. परंतु त्यांच्यावर चालू वर्षाचे पुनर्गठित पीक कर्ज होते. त्यांनी गावातील बचत गटाकडूनही कर्ज घेतले होते. ते आर्थिक परिस्थितीमुळे सतत तणावात असायचे. त्यामुळेच त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटनेचा तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.