गडचिरोली - 24 वर्षाच्या मुलीने पळून जाऊन अन्य जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वय-50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (वय-43), साईराम रवींद्र वरगंटीवार (वय-19) अशी मृतांची नावे आहेत.
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. परंतू, प्रेम विवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केला. संबंधित घटनेनंतर कुटुंबीय अस्वस्थ होते. अनेकांनी समजूत काढल्यानंतरही ते विरोधावर ठाम होते. याच तणावातून तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.
सोमवारी (10 फेब्रुवारी) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान विवेकानंद नगर परिसरातील मोकळ्या जागेतील विहिरीत जीव दिला. सोबत आणलेले सामान काठावर ठेऊन त्यांनी उड्या मारल्याचे समोर येत आहे. यासंबंधी माहिती पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.