गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात नक्षल आणि सी-60 जवानांमध्ये शुक्रवारी चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा(जां) हद्दीतील येलदडमी जंगल परिसरात सी-60 चे कमांडो शुक्रवारी सायंकाळी नक्षलविरोधी अभियान राबवत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षलवाद्यासोबत चकमक उडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर सी-६० कमांडोचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. घटनास्थळी एक नक्षलवादी मृत आढळून आला असून साहित्यही मोठ्या प्रमाणात आढळले.
हेही वाचा - 'विस्तारवादाचे युग संपले, आता विकासवादच वर्तमान आणि भविष्य'
चकमकीनंतर घटनास्थळी सी ६० जवानांनी शोध अभियान राबवले असता एक पुरुष नक्षलवादी मृत अवस्थेत आढळून आला. या जंगल परिसरात पाहणी केली असता देशविघातक कृती करण्यासाठी नक्षलवाद्यानी कॅम्प उभारला होता. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे ०१ हत्यार, २० पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आढळून आले. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविणे सुरू असून घटनेनंतर या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.