गडचिरोली - काँग्रेसने देशाला ५०-६० वर्षे 'एप्रिल फुल' बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी २ एप्रिलला प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हे सुद्धा 'एप्रिल फुल' आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा 'गरीबी हटाव'चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरीबी हटली नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे बोलताना केला.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, गोसेखुर्द प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करणार आहोत. विदर्भाने मुख्यमंत्री दिला, विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे १२४ कलम काढून टाकू असा उल्लेख आहे. पाकिस्तान, नक्षलवाद्यांसाठी कायदा बदलणार का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
मोदी सरकारने गरिबांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. विविध योजनांचे गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जाऊ लागले आहेत. ९८ टक्के कुटुंबाकडे आता शौचालये झाली आहेत. ५ कोटी कुटुंबांना गॅस दिले आहेत. मुद्रा कर्जाद्वारे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गरिबांना घरे देण्याचे काम मोदी सरकारने केले. दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन या देशात महामार्गांचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी सरकारच्या काळात झाले, अशी माहितीही त्यांनी भाषणात दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार भांगडिया स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.