गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. या वीरमरण आलेल्या जवानांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात आयोजित शासकीय कार्यक्रमात हवेत बंदुकीच्या ३ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जवानांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला. तर उपस्थित शेकडो गडचिरोलीकरांनीही अश्रुनयनांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली.
वीरमरण आलेल्या जवानामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४ तर राज्यातील विविध जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास घटना घडल्यानंतर आज सायंकाळी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास पार्थिव कुटुंबीयांच्या हाती मिळाले.
पार्थिव स्वगावी पोहोचविण्यासाठी तब्बल ८ ते १० तास वेळ लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाकडे मृतदेह हेलिकॅप्टर किंवा विमानाने पोहोचवून देण्याची विनंती केली होती. जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य करत नांदेड, बुलढाणा, हिंगोली, बीड या जिल्ह्यातील जवानांचे मृतदेह नेण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे काय, याची चौकशी केली. मात्र, वेळेवर विमानसेवा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कुटुंबीयांची समजूत घातली. त्यानंतर कुटुंबीयांनीही रुग्णवाहिकेद्वारे पार्थिव गावी नेण्यास तयार झाले. पार्थिव पाठवण्यात आलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ८ ते १० पोलीस शिपाई व एक पोलीस उपनिरीक्षक पाठवण्यात आले आहेत.