गडचिरोली - कोरोना विषाणूजन्य आजाराचे संकट पसरत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रीय राखीव दलाचे जवान धाऊन आले आहेत. त्यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शहरी भागात महत्त्वाच्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॅम्प नक्षलविरोधी कारवाईसाठी तैनात आहेत. या बटालियनच्या वतीने संचारबंदीदरम्यान गरीब-गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य वितरणाची विशेष मोहीम राबविली जात आहे.
नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. सोबतच त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ करण्यासाठी अन्न वितरणात फळांची देखील व्यवस्था केली गेली आहे. एकीकडे व्यवसाय- व्यवहार ठप्प असताना या घटकातील नागरिकांची मजुरी बुडाली आहे. हातात पैसे नसल्याने पोट कसे भरायचे ? याबाबत त्यांना प्रश्न पडला आहे. अशा वेळेस केंद्रीय राखीव पोलीस दलाने स्वच्छतेबाबत जागरुकता व अन्न पाकीटांच्या वितरणाची मोहीम राबवत आपल्यातील सैनिक सतत संवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे.
गडचिरोली शहरात एकूण तीन ठिकाणी अशी मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून कोरोना विषाणूजन्य आजाराचा लढा हे जवान आपल्या पद्धतीने लढत आहेत. आगामी काळातही अशाच पद्धतीची मोहीम विविध झोपडपट्टी व निर्धन परिवाराच्या वास्तव्य परिसरात राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.