गडचिरोली - 'प्रत्येक खेड्यात आरोग्य कार्यकर्ता (आशा)' हे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारने 2005 साली सुरू केलेली मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (आशा) ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात ग्रामीण कुटुंब व आरोग्य केंद्र यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावते. कोरोना काळात आशा सेविकांवर कामाचा भार वाढला आहे, तरी देखील त्या कर्तव्य निष्टेने उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर लाहेरी पोलीस स्टेशनच्या वतीने लाहेरी क्षेत्रातील सर्व आशासेविकांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
आशा सेविकेची मुख्य भूमिका ही माता व बाल आरोग्याविषयी गावातील महिलांमध्ये प्रबोधन करणे, प्रसुतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या इत्यादीची माहिती मातांना देणे अशी असते. परंतु, कोरोनामुळे आशा सेविकेच्या भूमिकेत वाढ झाली आहे आणि त्यांच्यावर जोखमी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात कोरोना तपासणी करणे, रुग्णांना उपचारासाठी तयार करणे आणि आता लस आल्यानंतर ती लस घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. ही कामे पार पाडताना त्यांना कित्येकदा गावकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. परंतु, त्यांनी समाजाची आरोग्य सेवा अबाधित राखत लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी अत्यल्प मानधनावर आपल्या कौटुंबिक जबाबदारी पार पाडत सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, व करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आदिवासीभाग असलेल्या लाहेरी परिसरामध्ये कोरोना लसीकरण करणे एक आव्हानच आहे. यासाठी तहसीलदार, बीडीओ, तसेच सर्व विभाग व त्यात कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत दिवस रात्र काम करत आहेत. त्यात आशा सेविका, अंगणवाडी सेविकानी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, समीर शेख, सोमय मुंडे, उप.वि.पो. अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व आशा कार्यकर्त्यांची उप.पो.स्टेशनला बैठक आयोजित केली. यामध्ये लसीकरण व्यापक व अधिक प्रभावी वेगवान करण्यासंबंधात चर्चा झाली.
एरवी आपल्या कर्तव्यात मग्न असणाऱ्या व फारशा प्रकाशझोतात नसणाऱ्या आशा कार्यकर्ता यांच्या कर्मनिष्ठेचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच आदिवासीबहूल भागामध्ये लसीकरण वेग वाढेल, अशी खात्री आहे. नक्षल प्रभावित अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा लाहेरी पोलिसांनी केलेला सन्मान नक्कीच प्रशंसनीय आहे. यावेळी उप.पो.स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, पो.उप.नि अजय राठोड, आकाश विटे, विजय सपकळसह सर्व पोलीस अमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी-60 कमांडोचे पोलीस मुख्यालयात जल्लोषात स्वागत