गडचिरोली- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात तीन दिवसांपूर्वी नागेपल्ली येथे कोरोना संशयित व्यक्ती सापडल्याने प्रशासनाचे वतीने नागेपल्ली गावाची सीमा चारही बाजूने पोलीस नाका लावून सील करण्यात आली. त्यामुळे नागेपल्ली येथील कुणीही व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही. तसचे बाहेरील कोणाला गावात येण्यास अनुमती नाही.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
आलापल्लीला लागून असलेल्या नागेपल्ली येथील काली माता मंदिर परिसरात एक कोरोना संशयित आढळला. त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून नागेपल्ली येथील गावच्या सीमा सील केल्या आहेत. यामध्ये आलापल्ली ते अहेरी आणि आलापल्ली ते आष्टी या प्रमुख मार्गाचा समावेश आहे.
गावाच्या चारही बाजूला पोलीस तपासणी नाका उभारण्यात आला आहे. याची पाहणी नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी केली. पोलिसांनी नागेपल्ली येथे कोणालाही प्रवेश देऊ नये. तसेच येथीलही कोणी बाहेर जाऊ नये याबाबत त्यांनी सूचना केल्या.
नागेपल्ली येथे एक संशयित रुग्ण सापडल्याने नागेपल्ली गावातील आणि त्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी सुरू असून शासनाच्या कंटेन्मेंट प्लॅन नुसार आम्ही काम करीत आहोत. या संबंधी डॉक्टर आणि विशेष ट्रेनिंग पूर्ण केलेली टीम डॉक्टरांसोबत असून 2 दिवस हे काम सुरू राहील त्याकरिता नागेपल्ली येथील गाव सीमा बंद करण्यात आले आहे. त्या संशयित व्यक्तीचा रिपोर्ट आली नाही. मात्र, नागरिकांनी घाबरू नये, स्वतःची काळजी घ्यावी, अफवा पसरवू नये, अफवांवर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले.