गडचिरोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची धक्कादायक अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे. गडचिरोली शहरालगतच्या विसापूर येथील राघोबाजी भोयर या वयोवृद्ध व्यक्तीचा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृतदेह 150 किलोमीटर दूरवर भलत्याच नातेवाईकांसह सिरोंचा येथे रवाना करण्यात आला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मृतदेह अदलाबदल झाल्याची कुणकुण भोयर यांच्या नातेवाईकांना आली होती. त्यांनी भोयर यांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा चेहरा पाहताच मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले. यानंतर संतापलेल्या भोयर यांच्या आप्तेष्टांनी रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. हादरलेल्या रुग्णालय व्यवस्थापनाने अखेर सिरोंचा येथील मृतदेह परत बोलावून नातेवाईकांना घाईघाईने सुपूर्द केला. कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचा आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याला फटका बसत आहे. जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यांतील भागांमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेर पडत नाही, घरीच राहने पसंद करीत आहेत. त्यामुळे, फुटपाथवर हाटेल चालविणाऱ्यांचा रोजगार हिरवला आहे. त्यातून मार्ग काढत फुटपाथ हाटेल व्यावसायिकांनी समोसा, आलुबोंड्यांची घरपोच सेवा सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात कोणी दिसत नाही, त्यामुळे लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, आता हाटेल व्यावसायिक सकाळी आलुबोंडा, समोसा हे नाश्त्याचे पदार्थ घेऊन घरो घरी त्यांची विक्री करत आहेत. लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने आज त्यांना घरपोच विक्री करून पोट भरावे लागत आहे.