गडचिरोली - 100 कोटींच्या वसुलीचा आरोप गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या IPS परमबीर सिंग यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादीने जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी चौकात टरबूज फोडत परमबीर सिंग यांचा निषेध व्यक्त केला आहे. परमबीरसिंग यांच्या संपत्तीची ACB चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसने शेतकरी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केले.
'भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही'
आपल्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपा बदनाम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हे प्रकरण रेटणाऱ्या भाजपा नेते फडणवीस, मुनगंटीवार यांचाही राष्ट्रवादीने निषेध केला. याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
'काळे कायदे मागे घ्यावे'
येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी निदर्शन आंदोलन करण्यात आले. 3 काळे शेतकरी कायदे मागे घेण्यासाठी हे आंदोलन केले गेले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड दरवाढ करून केंद्र सरकार सामान्य माणसांना अडचणीत आणत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. केंद्र सरकारने नफेखोरी न करता सामान्य माणसांना दिलासा देण्याचे आवाहन याप्रसंगी केले गेले. तीन काळे कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोलीच्या गांधी चौकात घोषणाबाजी केली.