गडचिरोली - मागील पंधरा दिवसांपासून कुरखेडा येथील आधारभूत धान खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी गोठणगाव नाक्यावर आमदार कृष्णा गजबे यांचा नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे कुरखेडा-कोरची, मालेवाडा व कढोली हे चारही रस्ते तीन तास ठप्प पडले होते.
हेही वाचा... 'कोरोना'चा फटका : पुणे-गडचिरोलीसह महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी चीनमध्ये अडकले
कुरखेडा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील मालाची उचल वेळेवर न झाल्याने जागेअभावी तसेच खरेदी संस्थाची कमीशनची रक्कम अदा करण्यात येत नसल्याने येथील सर्व संस्थानी १५ जानेवारी पासून खरेदी प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. मात्र, निर्माण झालेला पेच सोडवण्याकरीता शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.
हेही वाचा... युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...
यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात ५३ सहकारी धान खरेदी संस्थामार्फत आजपर्यंत ४ लक्ष ४७ हजार ८७८ क्विटंल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी १ लक्ष १० हजार क्विटंल धानाची साठवणूक उपलब्ध गोदामात तर ३ लक्ष ३७ हजार ८७८ क्विटंल धान हे संस्थेचा आवारात उघड्यावर साठवण्यात आलेले आहे. अनेक संस्थाकडे मालाला सुरक्षित ठेवण्याकरिता पुरेशा प्रमाणात व्यवस्था नाही. महामंडळाचा कूरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या १० खरेदी संस्थाची देखील हीच परीस्थीती आहे. त्यांच्या कमीशनची रक्कम प्रलंबीत आहे. त्यामूळे सामुहिकपणे १५ जानेवारीपासून काटा बंद आंदोलन सुरू करून खरेदी प्रक्रिया थांबवली आहे.