गडचिरोली : तेराव्याच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यात गेलेले 15 जण डोंगा उलटल्याने छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीत बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेतून 13 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले असून दोन महिला अद्यापही बेपत्ता आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथील 10 महिला व 5 पुरुष असे 15 जण मंगळवारी तेरवीच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील अटुकपल्ली येथे लाकडी डोंग्याने इंद्रावती नदी पार करुन गेले होते. ते सायंकाळच्या सुमारास परतत असताना इंद्रावती नदीत डोंगा दगडाला आपटुन पलटी झाला. त्यामध्ये दोन महिला व चार पुरुष असे सहा जण पोहत बाहेर आले. तर आठ महिला आणि पुरुष असे नऊ जण नदीच्या पाण्यात पडून वाहून गेले.
लक्ष्मीपती बंगारी तलांडी (वय-30, डोंगा चालक), लचन्ना नसय्या पालदेव (वय-35, डोंगा चालक), आचय्या मलय्या सडमेक (65), गोरय्या सोमय्या गावडे (50), सावित्री रामचंद्रम कल्लेम (45), आसम लक्ष्मी समय्या (35) अशी पोहून बाहेर आलेल्यांची नावे आहेत. तर, चिंतुरी निलक्का मदनय्या (35), चिंतुरी रिणा मदनय्या (15), चिंतुरी शोभा आनंदराव (18), चिंतुरी बायक्का किष्टय्या (65), कांता सत्यम येलम (48), सुनिता रमेश आसम (30), शांताबाई शिवय्या गावडे (60), ललिता गणपती गुम्मडी (35) आणि कोडपा कन्नय्या बुच्चम (55) हे नऊ जण पाण्यात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच सोमनपल्ली पोलिसांनी सोमनुर येथील मच्छिमार यांना माहीती देऊन मदत करण्यास विनंती केली. तेव्हा पोलीस व महसूल विभागाने संयुक्तपणे बचावकार्य राबवत वाहून गेलेल्यांपैकी सात जणांना वाचवले. दरम्यान, कांता सत्यम येलम व शांताबाई शिवय्या गावडे या दोन महिला मात्र अजूनही बेपत्ता असून, शोध मोहीम सुरू आहे.