गडचिरोली - 51 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपचा डाव फसला आहे. भाजपच्या चार व राष्ट्रवादीच्या एका सदस्याने आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. यामुळे अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांची निवड झाली.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी भाजपसोबत तर काँग्रेस आदिवासी विद्यार्थी संघटनेसोबत गेल्याने वेगळे समीकरण तयार झाले.
अध्यक्षपदासाठी आविसचे अजय कंकडालवार यांनी नामांकन दाखल केले. तर भाजपनेही आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचे सांगत नामदेव सोनटक्के यांचे नामांकन दाखल केले. तसेच उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून नाना नाकाडे, युधिष्ठिर विश्वास यांनी यांनी उमेदवारी दाखल केली. तर, काँग्रेसतर्फे मनोहर पोरेटी, राम मेश्राम यांनी नामांकन भरले.
काही वेळानंतर नाना नाकाडे व राम मेश्राम यांनी नामांकन मागे घेतले. सभागृहात हात उंचावून मतदानाला सुरुवात झाली. त्यावेळी भाजपचे शिल्पा रॉय, नीता साखरे, श्रीदेवी पांडवला, विद्या आभारे या चार सदस्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी अजय कंकडालवार यांच्या बाजूने मतदान केले. याला अतुल गण्यारपवार व वर्षा कौशिक या अपक्ष सदस्यांनी पाठिंबा दिला. यामुळे अध्यक्षपदी अजय कंकडालवार 22 विरुद्ध 29 मतांनी तसेच मनोहर पाटील पोरेटी यांची 22 विरुद्ध 29 मतांनी उपाध्यक्षपदी निवड झाली.
मागील वेळेस भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आदिवासी विद्यार्थी संघ अशी युती करुन भाजपच्या योगीता भांडेकर तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार विराजमान झाले. यावेळेस अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांनी 'फिल्डिंग' लावली होती.
एकूण सदस्य : 51
पक्षीय बलाबल : भाजप 20, काँग्रेस 15, आदिवासी विद्यार्थी संघ 7, राष्ट्रवादी काँग्रेस 5 व अपक्ष 4