गडचिरोली - जिल्ह्यात निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी अनेक गावे पुढे सरसावली आहेत. गावागावांतून जनजागृती रॅली काढली जात आहे. आम्हाला ही विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी उमेदवारही दारूबंदीचे समर्थन करणाराच हवा, अशी महिलांची मागणी पुढे येत आहे.
१९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मुक्तिपथ अभियान हाती घेतले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात दारूबंदीसाठी प्रयत्न केले जात आहे. निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांची मते पारड्यात पाडून घेण्याचा प्रकार घडू शकतो. असे होऊ नये यासाठी मुक्तिपथच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली जात आहे. अनेक गावांनी दारुमुक्त निवडणूक करण्याचा ठरावच घेतला आहे.
हेही वाचा - विदेशीची चव देशीत, धान्यापासून देशी दारू बनवायला सरकारची मान्यता
गावातील दारूबंदी टिकविण्यासाठी महिलाच मैदानात उतरल्या आहे. जनजागृती रॅली काढून जो पाजील माझ्या नवर्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू, जर व्हायचे आहे आमदार तर दारूबंदीला पाठिंबा द्यावाच लागेल, दारूविक्रीचे समर्थन करणारा आमदार चालणार नाही, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत देऊ नका अशा घोषणा दिल्या जात आहेत.
हेही वाचा - गोंदियात बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; साडे सहा लाखांचा माल जप्त