गडचिरोली - गावातील दारू विक्रेत्यांकडे महिला मुक्तिपथ आणि सिरोंचा पोलिसांनी छापा टाकत 3 ड्रम मोह सडव्यासह विदेशी दारू जप्त केली. सिरोंचा तालुक्यातील मदीकुंठा येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 4 विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मी 'त्यांना' फाशी देण्यास आतुर, अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य - जल्लाद पवन
मदीकुंठा येथील गाव संघटनेच्या महिला दारू विक्रेत्यांविरोधात ठामपणे उभ्या आहेत. गावातील दारुविक्री बंद करण्यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करीत आहेत. विक्रेत्यांना अनेकदा सूचना देऊनही ते जुमानत नसल्याने महिला मुक्तिपथ तालुका चमू आणि सिरोंचा पोलिसांच्या मदतीने त्यांनी दारू विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. गावातील विक्रेते दारू तयार करत असल्याच्या माहीतीवरून ४ विक्रेत्यांच्या छापा टाकला. यावेळी २ ड्रममध्ये टाकलेला गुळाचा सडवा, तर एका ड्रममध्ये टाकलेला मोहाचा सडवा आढळून आला. यासोबतच एका विक्रेत्याकडे विदेशी दारूच्या १२ बाटल्या सापडल्या. यावेळी जवळपास १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर पोलीस आणि मुक्तिपथ तालुका चमू जानमपल्ली या गावी पोहोचली. गाव संघटनेच्या महिलांच्या मदतीने पोलिसांनी एका घराची झडती घेतली असता १० लिटर गावठी दारू सापडली, तर ५ दारू विक्रेते फरार झाले. या विक्रेत्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.