गडचिरोली - आईची प्रकृती ठीक व्हावी, यासाठी बोलावलेल्या वैदूने व्यवस्थित उपचार न केल्याचा राग मनात ठेवून संगनमताने दोघांनी कुर्हाडीने वार करून ठार मारणाऱ्या आरोपींना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी आजीवन कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दीपक दुर्गा (25) व प्रदीप दुगा (22, रा. गोटाटोला, ता. धानोरा) अशी आरोपींची नावे आहेत.
आईची प्रकृती बिघडल्याने हत्या
24 मार्च 2014रोजी दानशूराम उसेंडी हे शेतात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. तेव्हा दीपक आणि प्रदीप या दोघांनी त्यांना शेतातून बोलावून आणत आईची प्रकृती ठीक नसल्याने औषधोपचार करून देण्यास सांगितले. मात्र आईच्या प्रकृतीस काही झाल्यास तुला पाहून घेऊ, अशी धमकी दिली होती. तोच राग मनात ठेवून 14 एप्रिल 2016रोजी दोघांनीही संगनमत करून दानशूराम उसेंडी यांच्या गळ्यावर कुर्हाडीने वार करून ठार केले. याबाबत धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरे सत्र न्यायाधीश यांचा निकाल
प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयान नोंदवून तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपींना 302, 34 कलमानुसार दोषी ठरवून आजीवन कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एन. एम. भांडेकर यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चा लवार यांनी काम पाहिले.