गडचिरोली - कोरची येथुन हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणारा जनावरांचा कंटेनर पोलिसांनी पकडुन 91 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरमोरी हद्दीतील वैरागड टी-पॉईंट येथे गुरुवारी कारवाई करण्यात आली.
कोरची येथुन हैदराबाद येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तीन कंटेनर ताब्यात घेतले. या कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ९१ जनावरे आढळुन आली. तर ४ जनावरे मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी जनावरे व कंटेनर असा एकूण ७६ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शाहरुख गफ्फार खान, मोहम्मद शकील समशेर (रा. हैदराबाद), अल्ताफ अक्बर शेख (रा. गडचांदुर), इब्राहिम खान हमीद खान (रा. हैदराबाद) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुध्द आरमोरी पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम कलम ११ (१) (ड), तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (१) (अ), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांच्यासह आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांनी केली.
हेही वाचा - मुंबईचा कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला पाटण्यातून अटक