गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात 9 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली आहे. दररोज येणारे पॉझिटिव्ह रिपोर्ट्मुळे जिल्हावाशियांमध्ये खळबळ उडाली आहे.
आज (सोमवार) आढळून आलेले सर्व रुग्ण मुंबईहून आलेले प्रवासी असून ते संस्थागत विलगीकरण कक्षात होते. असे असले तरी, त्यापैकी काही संशयास्पद स्थितीत वेगवेगळ्या गावांमध्ये फिरले असल्याच्या चर्चेमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्यातरी गडचिरोली जिल्ह्यात असलेल्यांपैकी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.
सध्या कोरोनाचा शिरकाव कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली व भामरागड या 7 तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये झाला आहे. कोरची, वडसा, धानोरा, मुलचेरा व सिरोंचा या 5 तालुक्यात कोरोना रुग्ण नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात 18 मे रोजी पहिले तीन रुग्ण आढळले व आठवडाभरात ही संख्या 24 वर पोहोचली आहे.
सद्यस्थितीत 1 हजार 153 संशयीत असून 463 निरीक्षणाखाली आहेत. तथा 447 तपासणी अहवाल येणे बाकी आहे. गृह विलगीकरणात असलेल्यांपैकी कोणाचेही अहवाल पॉझिटिव्ह आलेले नाहीत, ही जमेची बाजू आहे.
अद्याप पहिल्या कोरोनाबाधिताचा दुसरा अहवाल येणे प्रतिक्षेत आहे. तर दररोज बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत चालले असल्याचे दिसून येत आहे.
बाजार, बससेवा, रेल्वे, विमानसेवा आणि नियमित काम मर्यादित स्वरूपात सुरू झालेले आहे. पण यात फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. नागरिकांनीच यावर स्वयंशिस्त लावली नाही, तर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत प्रशासनाकडून कोविड मार्च काढून जनजागृती; जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन
हेही वाचा - लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, उन्हाळ्यातही पाणीसाठा भरपूर