आरमोरी (गडचिरोली) - तालुक्यातील किटाळी येथील गावसंघटनेच्या महिलांनी सूर्यडोंगरी जंगल परिसरात शोध मोहीम राबवली असता वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 23 ड्रम मोहसडवा आढळून आला. महिलांनी अहिंसक कृती करत मोहसडवा जप्त करुन जंगलातच नष्ट केला.
किटाळी गावात दारूबंदी करण्यासाठी गाव संघटनाच्या महिलांनी अथक परिश्रम घेतल्याने गाव दारुमुक्त झाला होता. मात्र, सूर्यडोंगरी येथील दारूविक्रेत्यांनी जंगलाचा आसरा घेत दारूचे अड्डे निर्माण केले. त्यामुळे दारुमुक्त असलेल्या गावातील व परिसरातील व्यसनी लोक जंगलाकडे धाव घेऊ लागले. ही समस्या किटाळी येथील मुक्तीपथ गावसंघटनेच्या लक्षात येताच महिलांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांनी सूर्यडोंगरी जंगलपरिसरात अहिंसक कृती करत चार ठिकाणांवर छापा टाकून जवळपास 23 ड्रम मोहसडवा जप्त करुन तो नष्ट केला .
सूर्यडोंगरी येथे दारूचा महापूर असून 45 घरांपैकी 37 घरे दारू काढून विक्री करतात. या एका गावाच्या माध्यमातून परिसरातील संपूर्ण गावांना दारूचा पुरवठा केला जातो. त्यामुळे दारूमुक्त असलेल्या विविध गावातील मद्यपी या गावाकडे धाव घेतात. परिणामी परिसरातील गावांमध्ये तंटे व कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. यामुळे येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे.
हेही वाचा - गडचिरोली: टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्या, अन्यथा आत्मदहन करू; टॅक्सी चालकांचा इशारा