धुळे - शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या शिवारात मांंगिलाल बारकु पावरा या शेतकऱ्याच्या शेतात तब्बल दोन कोटी 15 लाख 72 हजार रुपयांचा गांजा साठा पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी त्यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा मारला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुद्देमालाचे मोजमाप सुरु होते. पोलिसांनी छापा मारलल्यानंतर मांगीलाल बारकु पावरा (रा. लाकड्या हनुमान) हा संशयीत आरोपी फरार झाला आहे. त्यांच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट; सीमा बंद झाल्या अन् सिंधुदुर्गातील मशरूम उद्योजक आले अडचणीत
घटनास्थळी पोलिसांनी छापा मारला त्यावेळी हिरवट रंगाची पाने, बिया आणि काड्याचा चुरा असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ वेगवेगळ्या प्लॉस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला होता. अंदाजे 30 किलो वजनाच्या 128 गोण्या भरुन ठेवल्याचे निदर्शनाला आले. गांजाच्या साठ्याचे एकुण वजन तीन हजार 904 किलो आहे. सदर गांजा ही 5 हजार 500 रुपये किलो दराने विकला जातो, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी पकडलेल्या या साठ्यातुन प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे तीन नमुने पोलिसांनी घेतले, असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा संपूर्ण साठा आता पोलिसांनी जप्त केला असून याशिवाय घटनास्थळी 25 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल आणि तीन हजार रुपये किंमतीचा वजन काटा देखील जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, स्थानिक गुुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.