गडचिरोली - कोरोनाच्या संसर्गादरम्यान आतापर्यंत 16 हजार 608 लोक जिल्हयाबाहेरून आले होते. त्यापैकी 13 हजार 735 निरीक्षण कालावधी पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच दोन हजार 873 जणांवर आरोग्य विभाग अद्याप लक्ष ठेवून आहे. अद्याप जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह सापडला नसला तरीही, प्रशासनामार्फत बाहेरून दाखल होणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे.
जिल्हयात आत्तापर्यंत 16608 लोकांची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. तसेच बाहेरून आलेल्या प्रत्येकाने स्वत:ची नोंद प्रशासनाकडे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचप्रमाणे संबंधितांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे आजाराबाबत लक्षणे नसली, तरी या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात न येण्याच्या सूचना आरोग्य विभागातून देण्यात आल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने कोणी अडचणीत असेल, तर जवळच्या तहसीलदार कार्यालयात संपर्क साधा. तसेच जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या मदत केंद्रावर संपर्क साधून अशा लोकांबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. स्थलांतरित लोकांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून देखील मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.