धुळे - कोरोना लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प झाले आहेत. विविध राज्यातील परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासनी घाटात असाच मजुरांचा एक जथ्था अडकून पडल्याने प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश शासनाने त्यांना प्रवेश नाकारल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर हा गोंधळ निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने परप्रांतीय मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने हे मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायी निघाले आहेत. यातील बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेशातील कानपूर आणि गोरखपूर येथील रहिवासी आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिजासनी घाटात सध्या या मजुरांचा लोंढा अडकून पडला आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना प्रवेश नाकारल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर या मजुरांनी गोंधळ घातला.
मजूरांच्या या लोंढ्यांचे काय करायचे? असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला आहे. मुंबईहून काही मजूर पायी तर काही सायकलद्वारे निघाले होते. सोमवारी सकाळी शिरपूर सेंधवा दरम्यान मध्य प्रदेशच्या सीमेवर ते पोहोचले. मात्र, इतक्या लांबचा प्रवास करून आल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांनी गोंधळ घातला. या मजुरांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सेंधवा आणि सांगवी पोलिसांनी त्यांना रोखून धरले.