धुळे - सोमवारी (३० सप्टेंबर) भाजपच्या मेगा भरतीचा चौथा टप्पा पार पडला. यामध्ये काँग्रेसच्या २ विद्यमान आमदारांसह वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. येथून भाजपची उमेदवारी डॉ. जितेंद्र ठाकूर यांनाच मिळावी, अशी मागणी मंगळवारी झालेल्या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी केली.
शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, गेल्या ९ वर्षापासून शिरपूर तालुक्यात भाजपचे काम करणारे डॉ. जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे धुसर झाली आहेत. जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिरपूर येथे चिंतन मेळावा घेण्यात आला. यावेळी ठाकूर यांनी भाजपची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या मेळाव्याला शिरपूर विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. या मेळाव्यात डॉ. जितेंद्र ठाकूर यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करावी. कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं आवाहन भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. डॉ. जितेंद्र ठाकूर यांना निवडणूक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत देखील मोठ्या प्रमाणावर जाहीर केली. मी गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे. यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास यावेळी जितेंद्र ठाकूर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.