धुळे - शहराजवळील वरखेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक ३ वर तापी नदीच्या जलवाहिनीला गळती लागून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहेत.
शहराला सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, तरीही जलवाहिनीला गळती लागून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
जलवाहिनीला गळती लागल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. काही अज्ञातांनी जलवाहिनीचा व्हॉल्व फोडल्याने ही गळती लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.