धुळे : सध्या खरीप पिकाच्या काढणीचा हंगाम सुरु ( Harvesting season of kharif crop begins ) आहे. काही ठिकाणी ही पिके काढणी पूर्ण झालीय तर काही ठिकाणी अजूनही खरीप पिके काढणी सुरु आहे. काढणी करून शेतात ठेवलेल्या या पिकांवर चोरट्यांचा डोळा असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत ( Farmers in concern ) भर पडली आहे. धुळे जिल्ह्यात पांढरे सोने अर्थात कापूस चोरीच्या घटना सध्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र आता कापूससोबत सोयाबीन देखील चोरी होत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली ( Farmers lost sleep ) आहे.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेणपूर शिवारातील सडके शिवार भागात ४९ वर्षीय सुनील विश्वासराव घरटे या शेतकऱ्याने शेतातील घराच्या ओट्यावर ६० हजार रुपये किंमतीच्या सोयाबीन च्या १० क्विंटल वजनाच्या १४ गोण्या भरून ठेवल्या आहेत. तसेच कांदा चाळीत १ लाख ८ हजार रुपये किंमतीचा १२ क्विंटल कापूस अर्थात पांढरे सोने ३१ गोण्यांमध्ये भरून ठेवला. असा एकूण १ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा हा शेती माल १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी चोरून नेल्याचे १७ नोव्हेंबरच्या सकाळी निदर्शनास आल्याने शेतकरी सुनील विश्वासराव घरटे यांना धक्काच बसला. त्यांनी साक्री पोलीस स्टेशनला गुरुवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिलेल्या फिर्यादी नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर बी आहिरे करत आहे.