धुळे - जिल्हा न्यायालयात तक्रारदाराने विरुध्द पक्षाच्या वकिलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय बाविस्कर असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे. तर अनिल पवार असे मारहाण करणाऱ्या तक्रारदाराचे नाव आहे. या प्रकरणामुळे जिल्हा न्यायालयात एकच गोंधळ उडाला.
जिल्हा न्यायालयात अनिल पवार याचा खटला सुरू आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाचे वकील म्हणून संजय बाविस्कर हे काम पाहत आहेत. ते आज शनिवार त्याच खटल्यासंबधी माहिती घेण्यासाठी न्यायालयात गेले होते. ते लिपीकाकडून माहिती घेत असताना अनिल पवारने लिपीकाला माहिती देण्यास मज्जाव केला. तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
ज्यात तक्रारदार अनिल पवारने वकील बाविस्कर यांना कॉलर पकडून मारहाण केली. या मारहाणीत त्याने बाविस्कर यांचा गळा आवळल्याचा आरोप करण्यात येत आहे. तेव्हा बाविस्कर यांनी आपली कशीबशी सुटका केल्याचेही बाविस्कर यांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर अनिल पवारने त्या ठिकाणाहून पळ काढला.
अनिल पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा धुळे जिल्हा बार असोसिएशनने निषेध केला आहे. वकिलांवर होणारे हल्ले अतिशय वाईट असून लोकशाहीला घातक आहेत. याप्रकरणी अनिल पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप पाटील यांनी केली आहे. मात्र, याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.