धुळे- लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाले आहेत. डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे २ लाख ३५ हजार ९४५ मतांनी विजयी झाले. एकंदरीतच गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मोदींचा करिष्मा पाहायला मिळाला. डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी धुळे मनमाड इंदौर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन, यासोबत विविध विकास कामांचे केलेले उद्घाटन यामुळे धुळेकर जनतेने डॉ. सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी केले.
काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना मात्र या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कुणाल पाटील यांचे वडील आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या विविध संस्थांमधील कर्मचारी हे प्रचंड नाराज असून त्यांनी आपला राग हा मतपेटीतून व्यक्त केला. तसेच निवडणूक प्रचार काळात हिंदू धर्मीयांबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले, अस म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आणि समस्या प्रलंबित असून याठिकाणी प्रामुख्याने सिंचन, रोजगार, कृषीमालाला न मिळणारा हमीभाव असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहे. येत्या ५ वर्षात डॉ. सुभाष भामरे हे या मतदारसंघाचा विकास करतात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.