धुळे - चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर पायी जाण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या वाहनातून जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात नेले.
देवळा सौंदाणे रस्त्यावर सप्तशृंगी गडाहून यावलला जाण्यासाठी निघालेली एसटी (बस क्रमांक एमएच १४ बीटी १६०४) बस दहा फूट खोल कोसळली. एसटीतील महिला लहान मुले, वृद्ध महिला आणि तरुण जबर जखमी झाले. यादरम्यान संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वनी गडावर निघाले होते. त्यांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवून तत्काळ मदत कार्य सुरू केले.
डॉक्टर सुभाष भामरे यांनी स्वतःच्या प्रचार वाहनात जखमींना बसवून देवळा ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्यावर तेथील डॉक्टरांना तातडीने उपचार करायला सांगितले. तसेच स्वतः रुग्णांची तपासणी केली. डॉ. भामरे यांच्या मदतकार्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ३ तरुणांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. देवीच्या भक्तांसाठी भामरे यांनी सर्व यंत्रणेला कामाला लावून मदत कार्य राबवल्याने जखमी भाविकांना वेळीच उपचार मिळाले. त्यामुळे सर्वांनीच आमदार डॉक्टर भामरे यांचे आभार व्यक्त केले.